Saturday, July 1, 2017

श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग १)
सध्या महाराष्ट्रात सर्वांनाच वेध लागले आहेत ते पंढरपुरी उभे असलेल्या गोपाल कृष्ण रूपी विठ्ठलाचे. महाराष्ट्रातील वारीची परंपरा पाहिली की मन शेकडो वर्ष मागे जातं जेव्हा कर्नाटकातून दास देखील भगवद्गुण संकीर्तन करत करत पंढरपुरी यायचे. भेदा-अभेदा पलिकडील भगवद्भक्तीचा अमृतानुभव महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संत तेव्हा मुक्तहस्ते वाटयचे. हरी ही भवसागर तरून नेणारी केवळ दोन अक्षरे सर्वांच्याच मुखी असून त्याने आसमंत दुमदुमून जायचा. आणि अखेरीस ते सावळे परब्रह्म भक्तांच्या हृदय सिंहासनावर विराजमान व्हायचे.
इसवी सन १४०० ते १८०० या जवळपास ४०० ते ५०० वर्षांच्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या भूमीने संगीत, विठ्ठल, आणि भक्ती हे बरोबरीनं अनुभवलं. महाराष्ट्रात आजही वारीची परंपरा टिकून आहे याविषयी अभिमान आणि कर्नाटकात ती परंपरा जपली गेली नाही याची थोडी खंत उराशी बाळगत लेखनमालेला सुरूवात करतो.
दासांची काही पदे आषाढी एकादशीपर्यंत यथाशक्ति जाणून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील काही दिवस करणार आहोत. दास परंपरेतील बहुतांश अभंग हे पं. भीमसेन जोशींमुळे अजरामर झाले. महाराष्ट्रात ते ऐकलेही जातात पण त्याचा अर्थ मात्र समजत नाही. असेच काही ज्ञात-अज्ञात आणि अभंग चिंतनाकरता घेतले आहेत. आज "यादव नी बा" या अभंगाने आपण प्रारंभ करूया...
यादव नी बा यदुकुल नंदन माधव मधुसूदन बारो
सोदर मावन मधुरेलि मडुहिद यशोदे कंद नी बारो ||प||
कणकालंदिगे घुलू घुलूरेनुतलि झण झण वेणु नाददलि
चिणकोल चेंडु बुगुरिय नाडुत सण्ण सण्ण गोवळ रोडगूडी || १ ||
शंख चक्रवु कैयलि होळेयुत बिंकद गोवळ नि बारो
अकलंक चरितने आदिनारायण बेकेंब भक्तरिगोलिबारो || २ ||
खगवाहनने बगे बगे रूपने नगे मोगदरसने नी बारो
जगदोळु निन्नय महिमेव पोगळुवे पुरंदर विठ्ठल नी बारो || ३ ||
या रचनेत संत पुरंदरदास भगवान श्रीकृष्णांना बोलावत आहेत. यदु वंशीय कृष्णांना दास, 'हे यादवा तू ये' अशी विनवणी करत आहेत. पुढे ते भगवंताला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. हे माधवा, मधुसूदना तू ये. सर्व शब्द वाच्य, अनंत नामे असणाऱ्या भगवंताला बोलवण्यासाठी दासांनी ही दोनच नामे का वापरली आहेत? भगवंताची अनंत रूपे आहेत. त्यातील २४ रूपे आपल्याला ज्ञात आहेतच. त्यात माधव आणि मधुसूदन ही रूपे येतात.
मा म्हणजे ज्ञान. धव म्हणजे अधिपति ज्ञानाचा अधिपती असलेला. मधुसूदन म्हणजे मधु नामक दैत्याचा संहार करणारा. हा शब्दार्थ झाला. पण याचबरोबर २४ रूपांचा संबंध २४ तत्त्वांशी आहे. त्यांतील "अहंकार" आणि "डोळे" या तत्त्वांचं अधिपत्य माधव आणि मधुसूदन रूपांकडे आहे. म्हणजेच या वेगवेगळ्या तत्त्वांचं नियंत्रण वेगवेगळ्या भगवद् रूपांकडे असतं.
अहंकार म्हणजे ego नव्हे तर awareness of the self! स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. आधी मी देह आहे याचीच जाणीव आपल्याला असते पण मी देह नाही हे जाणले कीच स्वस्वरूपाची जाणीव होते. त्यामुळे मी खरा कोण आहे या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठीच दास माधव रूपाला आळवत आहेत. आणि त्याचबरोबर डोळे, बाह्य आणि अंतःचक्षु देखील. या आतील बाहेरील डोळ्यांनी फक्त तुलाच बघता यावे या भावातून दास मधुसूदन रूपाला बोलावत आहेत.
पुढे म्हणतात, सोदर मावन म्हणजे मामा. मथुरेत कंसाचा संहार करणाऱ्या, हे यशोदेच्या कंदा किंवा नंदना तू ये!
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: