Saturday, October 8, 2016

**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ६)
इकडे तिकडे कुठेही न जाता भक्तांच्या घरामध्ये तू स्थिर राहा म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल अशी विनवणी करून दास पुढे म्हणतात,
सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥
हे आई, साधु सज्जनांना तुझ्यामुळे सत्य बघता येते, जाणता येते. त्यांना सत्य दाखवणारी तू आहेस. इथे चित्तदि म्हणजे चित्त हा अर्थ नाही. सोने जसे चकाकते, त्याचे जसे तेज असते, त्याने दैदीप्यमान झालेल्या, मोहक अशा एका बाहुलीसारखे तुझे रूप आहे. गोंबे म्हणजे बाहुली. पुत्थळि म्हणजे मोहक किंवा क्षणात आवडेल असे.
आई महालक्ष्मीची कृपा असल्याशिवाय साधना सुरूच होत नाही. सकल जीवांची आई आहे ती. आई श्रेयस्कर देते, प्रेयस्कर नाही. सत्य दाखवणारी अशी ती आहे. आणि आपण भगवंताचा हट्ट धरलेला आईला आवडतो. ती खचितच तो हट्ट पुरवते. त्या परब्रह्म भगवान नारायणापर्यंत जी पोहोचवते ती ही आई महालक्ष्मी. भगवंताच्या शंख, चक्र, गदा, पद्म यातील पद्म हे मोक्षाचे प्रतिक मानले गेले आहे. शांती, सत्त्व, मोक्ष प्रदान करणारे. आणि आई महालक्ष्मी तोच मार्ग दाखवते. याविषयी श्रीसूक्तात वर्णन येतेच, पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मालये पद्मदलायताक्षी । असा मोक्षाचा मार्ग ही पद्मरूपी लक्ष्मी प्रदान करते. आपल्या सर्वांचा प्रवास हा अनित्यात राहून शाश्वत सत्यासाठीच तर चालला आहे. तो सत्याचा मार्ग दाखवणारी तू आहेस आई.
आणि पुढे तिच रूप कसं आहे याविषयी सांगतात, चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥
बाहुली कशी मोहक असते. येथे मोहकचा शब्दशः अर्थ घेणे योग्य ठरणार नाही. पण अशी गोष्ट जी सहज आपल्याला आवडते आणि आपली होऊन जाते. असा गुण जिच्यात आहे अशी बाहुलीसारखी आणि त्याचबरोबर सोने, चांदी, हिरे हे जसे चकाकतात आणि त्याचे जे तेज असते त्याने प्रकाशित झालेले असे तुझे रूप आहे.
दासांच्या जीवन चरित्रातील एक कथा आपण आज पाहणार आहोत.
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा पुरंदरदासांना भेटायला उत्सुक होता. नवकोट नारायण, सावकार, सर्वस्व त्याग करून हरिदास बनतो ही गोष्ट राजाला खूपच आश्चर्यकारक वाटत होती. अखेर एक दिवस राजा आणि दासांची भेट झाली. राजाने त्यांचा अन्न वस्त्र आभरणांनी सन्मान केला. पण दासांनी हे सर्व गावातील गोर-गरीबांना वाटून टाकले. राजाने त्यांचा सन्मान केला होता खरा, पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणूनच. त्याला दासांचे श्रेष्ठत्त्व अजिबात कळले नव्हते.
पुरंदरदास रोज भिक्षा मागत, तेव्हा ते राजवाड्यासमोरही भिक्षेसाठी उभे राहत. तेव्हा राजवाड्यातून त्यांना रत्नमोतींनी भरलेल्या सुपाने भिक्षा दिली जात असे. आणि त्यामुळे त्या हिऱ्या,रत्नांचे खडेही भिक्षेत पडत असत. दोन तीन दिवस हा सततचा चाललेला प्रकार पाहून राजाला संशय आला. राजा व्यासतीर्थांकडे आला आणि म्हणाला, " स्वामी तुम्ही तर पुरंदरदासांना वैराग्यमूर्ति म्हणता, त्यांच्यावरती गौरव करणारी पदे रचता, पण ते तुमचे दास किती लोभी आहेत पहा. तीन दिवस रत्न, मोती देऊनही अजून त्यांची तृप्ति झालेली नाही. नित्य भिक्षेला येतात." हे ऐकून व्यासतीर्थ म्हणाले, "असे होय. चल आपण जाऊन बघुया कसे आहेत दास."
पुरंदरदास गावाबाहेरील मारूतीच्या मंदीरात राहायचे. तिथे राजा आणि स्वामी दोघेही आले. आणि बघतात तर देवळाबाहेर कोपऱ्यात मोती रत्नांचा ढीग पडला होता. दासांची पत्नी भिक्षेच्या झोळीतून खडे, कचरा म्हणून जे काही टाकत होती, ते दास बाजूला कचऱ्यात जमा करत होते त्याचाच हा ढीग जमा झाला होता. "अलिकडे दोन-तीन दिवस भिक्षेत खूपच कचरा येतोय नाही?" दासांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे उद्गार ऐकून राजा लज्जित झाला. त्याने व्यासतीर्थ आणि पुरंदरदासांची क्षमा मागितली. आणि दास खरोखरच वैराग्यमूर्ति आहेत असे गौरवोद्गार काढले.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: