Thursday, September 15, 2016

"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग ३)
वायुदेवाच्या तीन अवतारांचे वर्णन करताना पहिले कडवे प्रभु रामचंद्रांना प्रिय असणाऱ्या हनुमंत आमचे मंगल करोत, असे म्हणून द्वितीय अवातार असणारे भीमसेन यांचे वर्णन दुसऱ्या कडव्यात करतात.
पडवीयोळ कुंती या 
वडलजातनु तन्न
मडदीय बचसीद किचक नन्नु
तडेयदे कवंदवगे || ३ ||
पडवी म्हणजे येथे भूमी असा अर्थ आहे. वायुदेव कुंतीचा पुत्र भीमसेन म्हणून भूमीवर आले. ज्यांनी किचकाच वध केला. किचक हा मत्स्य देशीच्या राजा विराटाचा सेनानायक होता. तो द्रौपदीच्या सोंदर्याला भाळला होता. त्याच्यापासून सुटका द्रौपदीची सुटका करण्यासाठी भीमसेनांनी किचकाचा वध केला. असे भीमसेन आमचे मंगल करोत.
द्रौपदीमध्ये पाच देवतांच्या पत्नीचे अंश होते. त्यातील एक म्हणजे भारतीदेवी. म्हणून तिला पाच पती होते. कारण त्या पाच पांडवांमध्येही पाच देवतांचे अंश होते. जसे भीमसेनांमध्ये वायु आणि द्रौपदीमध्ये भारती देवी.
महाभारतात आणि इतर पुराणातही याचा उल्लेख येतो. यमाचा अंश धर्मराजामध्ये म्हणून यमाची पत्नी श्यामला तिचा अंश, इंद्राचा अंश अर्जुनामध्ये म्हणून त्याची पत्नी शची तिचा अंश, अश्निनीकुमार या देवतांचे अंश नकुल आणि सहदेवांमध्ये पण त्यांना पत्नी एकच उषा तिचा अंश, आणि पार्वती देवीचा अंशही द्रौपदीमध्ये होता असे भगवान वेदव्यासांनी महाभारतात उल्लेख करून ठेवले आहे. यावर खूप विश्लेषण करता येण्यासारखे आहे पण येथे तो प्रतिपद्य मुद्दा नाही.
भारती आणि सरस्वती यांचे कार्य एकच आहे. तो भारतीस समानर्थी शब्द सुद्धा आहे. जरी ब्रह्मदेवांची सरस्वती, वायुदेवाची भारती, गरूड देवाची सौपर्णी, शेषदेवाची वारूणी, रूद्र देवांची पार्वती, अशा क्रमाक्रमाने त्या त्या देवतांची सहचारिणी शास्त्रात उल्लेखलेली आहे तरी सुद्धा भारती, सरस्वती ज्ञान प्रदान करणाऱ्या आहेत. भारतीला स्वस्ति असेही म्हणतात.
आता तिचे कार्य कोणते? शब्द म्हणजे एकाप्रकारे वायु किंवा हवाच. जोपर्यंत त्या शब्दाचे,अक्षराचे ज्ञान होत नाही तोपर्यंत केवळ ओठ हालत असतात ज्यातून हा वायू खेळत असतो. तेव्हा हे भारतीदेवीचे कार्य असते की, त्याचे ज्ञान आपल्याला होईल. मनात आलेले विचार शब्दांमध्ये मांडता येणं यासाठी भारतीदेवीची कृपा असावी लागते. मूक असणाऱ्याला जिची कृपा लाभल्यावर बोलता येते, जडबुद्धी, अज्ञानी असणाऱ्याला जिच्यामुळे ज्ञान प्राप्त होते अशी भारतीदेवी माझ्या वाचेमध्ये तुझे सन्निधान नित्य राहो.
अशा भारतीदेवीचा अंश द्रौपदीमध्ये होता आणि तिच्यासाठी, वायुदेवाचे अवतार असलेल्या भीमसेनांनी किचकास मारले याबद्दल व्यासराजस्वामींनी या दुसऱ्या कडव्यात सांगितलेले आहे.
शेवटी मध्वाचार्यंबद्दल सांगून या मंगलमचा शेवट होतो. ते पुढील भागात जाणून घेऊ.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: